इफ्फी, गोवा येथे राज कपूर यांची शताब्दी विशेष सत्रातील रणबीर कपूरच्या उपस्थितीसह साजरी
इफ्फी, गोवा येथे राज कपूर यांची शताब्दी विशेष सत्रातील रणबीर कपूरच्या उपस्थितीसह साजरी
प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक राज कपूर यांच्या शताब्दी समारंभाचा एक भाग म्हणून, 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) राज कपूर यांचे नातू रणबीर कपूर आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते राहुल रवैल यांनी एका विशेष सत्रात उपस्थित राहून या कलाश्रेष्ठाला आदरांजली वाहिली. हे सत्र म्हणजे राज कपूर यांचे भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदान, त्यांचा चिरस्थायी प्रभाव आणि त्यांच्या कलाकृतींचा उच्च वारसा यांचा आकर्षक धांडोळा होता. रणबीर कपूर यांनी त्यांच्या आजोबांचा विलक्षण प्रभाव विशद करून राज कपूर यांचे चित्रपट काळ आणि सीमा ओलांडतात, हे अधोरेखित केले. आवारा, मेरा नाम जोकर आणि श्री 420 यांसारख्या चित्रपटांची सार्वत्रिक मोहिनी कशी होती, ते रशियापासून भारतापर्यंत जगभरातील प्रेक्षकांमध्ये खोलवर कसे रुजले यावर त्यांनी स्पष्ट केले. राज कपूर यांच्या चित्रपटांच्या प्रासंगिकतेवर प्रकाश टाकत, रणबीर यांनी आवाराच्या संकल्पनेने जातीवादाचा कसा वेध घेतला, हे नमूद केले तर श्री 420 हा लोभ आणि महत्त्वाकांक्षेचे विषय हाताळण्यात मध्ये गुंतला होता, प्रेमरोग आणि राम तेरी गंगा मैली यांसारख्या नंतरच्या चित्रपटांची स्त्रियांच्या समस्या आणि सामाजिक आव्हानांवरील नैतिक कथनांसाठी प्रशंसा करण्यात आली, ज्यामुळे काळाच्या पुढे असलेला चित्रपट निर्माता म्हणून राज कपूर यांचा दृष्टिकोन अधोरेखित केला गेला. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), भारतीय राष्ट्रीय चित्रपट अर्काईव्ह्ज (एनएफएआय) आणि फिल्म हेरिटेज फौंडेशन या संस्थांच्या सहकार्याने राज कपूर यांच्या चित्रपटांचे पुनर्संचयन करण्याच्या प्रयत्नांची देखील रणबीर कपूर यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की राज कपूर यांचे दहा चित्रपट याआधीच पुनर्संचयित केलेले असून डिसेंबर 2024 मध्ये भारतभरात ते प्रदर्शित करण्याचे नियोजन सुरु आहे. भारतीय चित्रपटसृष्टीची पायाभरणी करण्यात राज कपूर यांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान करत, राज कपूर यांची चित्रपटीय प्रतिभा जतन करण्याच्या तसेच त्याचा उत्सव साजरा करण्याच्या महत्त्वावर रणबीर कपूर यांनी अधिक भर दिला. या सत्रामध्ये चित्रपट निर्मिती, अभिनय आणि सामाजिक समस्यांवर उपाय शोधण्यात चित्रपटांची विकसित होत गेलेली भूमिका यासंदर्भातील चर्चेचा देखील समावेश होता.पिता झाल्यानंतर पर्यावरण आणि सामाजिक बदलांप्रती आपण अधिक जागरूक झालो असे सांगताना रणबीर कपूर यांनी कलाकारांना त्यांचे मंच जागतिक कल्याणासंदर्भात ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आणि त्याचे समर्थन करण्यासाठी वापरावेत असे आवाहन केले. जगभरातील महान कलाकारांकडून प्रेरणा घेऊन स्वतःची वेगळी अशी शैली विकसित करण्यासाठी नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देऊन रणबीर यांनी अभिनयात स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असण्याचे महत्त्व अधोरेखित केले.सत्राच्या शेवटी, रणबीर कपूर यांनी हा आदरांजलीपर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल इफ्फीप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि उपस्थित प्रेक्षकांना राज कपूर यांच्या चिरंतन कार्याचा आनंद घेऊन त्याचे हृदयात जतन करण्याचे आवाहन केले. रणबीर याने व्यक्त केलेल्या विचारांना दुजोरा देत राहुल रवैल यांनी चित्रपट सृष्टीवरील तसेच समाजावरील राज कपूर यांच्या कायमस्वरूपी प्रभावाचा उल्लेख केला.
या सत्रात केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभाग सचिव संजय जाजू, सुप्रसिध्द भारतीय चित्रपट निर्माते आणि इफ्फीचे महोत्सव संचालक शेखर कपूर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाचे संयुक्त सचिव आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रीथूल कुमार आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागातील चित्रपट विभागाच्या संयुक्त सचिववृंदा देसाई यांनी भाग घेतला.
(छायाकार : रमाकांत मुंडे )
By Sunder M