‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव
हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!
सध्या सर्वत्र ‘वडापाव’ या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. चित्रपटातील गाणी व ट्रेलरला प्रेक्षकांचा कमाल प्रतिसाद मिळत आहे. तसेच चित्रपटाचे प्रमोशनही जोरदार सुरू आहे. या बहुचर्चित चित्रपटाचा भाग होण्यासाठी रामनाथ पय्याडे कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी स्टडीज यांनी ‘वडापाव’ च्या टीमला खास आमंत्रित करून त्यांना एक भन्नाट सरप्राईज दिले. कॉलेजमधील टॅलेंटेड शेफ्सनी तब्बल साडे सात किलोचा वडापाव बनवला! शेफ्सची ही पाककृती पाहून ‘वडापाव’ ची टीम थक्क झाली व त्यांनी या वडापावचा आस्वाद घेतला.
या खास प्रसंगी प्रसाद ओक गौरी नलावडे, रितिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, सिद्धार्थ साळवी, शाल्व किंजवडेकर, डॉ. महेश पटवर्धन व निर्माते अमेय खोपकर, निनाद बत्तीन, मौसीन खान उपस्थित होते.
यावेळी दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाले, “ हे एक खरच खूप सुंदर सरप्राईज आहे. इतका मोठा वडापाव साकारणं अतिशय कठीण व आव्हानात्मक आहे. मात्र, या शेफ्सच कौतुक करण्यासारखं आहे. त्यांनी साडे सात किलोचा हा वडापाव आमच्यासाठी तयार केला. या कुरकुरीत सरप्राईजसाठी मी संपूर्ण टीमकडून कॉलेजमधील शेफ्स आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. आज आम्हाला हा भव्य आणि चविष्ट वडापाव भेट म्हणून मिळाला, आणि आम्हीही तुम्हा सर्वांना आमच्या ‘वडापाव’ची भेट २ ऑक्टोबरला देणार आहोत.”
