Entertainment

राहूल देशपांडे आणि आर्या आंबेकरच्या सुरांतून होणार आगळ्या वेगळ्या गावाचं दर्शन तुंबाडची मंजुळामधील पहिलं गाणं प्रदर्शित

झी स्टुडिओज निर्मित ‘तुंबाडची मंजुळा’ या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. टीझरमधील गावकऱ्यांची हटके झलक पाहून प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. या गावात नेमकं काय वेगळं आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झालेली असतानाच आता चित्रपटातील ‘असं वेगळं गाव’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याचं वैशिष्ट्यं म्हणजे शास्त्रीय आणि सुगम संगीतातील सुप्रसिद्ध नाव राहुल देशपांडे आणि गोड गळ्याची गायिका आर्या आंबेकर यांच्या सुरांतून या गावाचं दर्शन होणार आहे. या दोघांच्या आवाजातील भावपूर्णता आणि सहजता गाण्याला एक वेगळीच उंची देते. या गाण्याच्या निमित्ताने ही दोन नावे प्रथमच एकत्र आली असून त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये या गाण्याबद्दलची उत्कंठा वाढली आहे.

गाण्याबद्दल राहुल देशपांडे म्हणतात, ” ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटामधील हे एक अतिशय फ्रेश आणि वेगळ्या धाटणीचं गाणं गाण्याची संधी मला मिळाली, याचा मला खूप आनंद आहे. या गाण्याचं संगीत अत्यंत आधुनिक असूनही त्यात गावाकडचा गंध सुंदरपणे जपला आहे, ही त्याची खासियत आहे. याचे शब्द आणि चाल ही आजच्या काळाशी सुसंगत अशीच असून मला खात्री आहे की, हे गाणं प्रेक्षकांना नक्की आवडेल.”

आर्या आंबेकर म्हणते, “ हे गाणं गावाची एक सुंदर, मनाला भिडणारी गोष्ट सांगते. अशा प्रकारचं वेगळ्या धाटणीचं गाणं मी पहिल्यांदाच गात असून प्रेक्षक जेव्हा चित्रपटात हे गाणं पाहातील आणि ऐकतील तेव्हा त्यांना चित्रपटाचं बॅकग्राउंड आणि संगीत किती वेगळ्या पद्धतीचे आणि खास आहे हे जाणवेल.”

असं वेगळं गाव’ हे गाणं गावकऱ्यांच्या अतरंगी आणि सतरंगी स्वभावाची अत्यंत रंगतदार आणि मनमोहक झलक सादर करतं. गुण्यागोविंदाने नांदणारं, आपुलकीने बांधलेलं आणि आनंदाने बहरलेलं गाव या गाण्यातून जिवंत होतं. गावातील प्रत्येक व्यक्तिरेखा, त्यांची वेगळी ढब, त्यांची मस्ती, त्यांच्या नात्यांमधील ऊब आणि एकमेकांबद्दलचं निखळ प्रेम या सगळ्यांचा सुरेल संगम या गाण्यात अनुभवायला मिळतो. हे गाणं मातीशी घट्ट जोडलेलं, गावकुसातील जीवनाचं प्रतिबिंब दाखवणारं आहे. कोकणातील निसर्गरम्य लोकेशन्सवर या गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं असून, हिरवाईने नटलेला परिसर, आणि गावातील साधेपणाचं सौंदर्य या गाण्यातून अत्यंत प्रभावीपणे टिपण्यात आलं आहे. विक्रम एडके यांचे शब्द असलेल्या या गाण्याला असीम कुऱ्हेकर, प्रतीक केळकर आणि तेजस जोशी या संगीतकार त्रयींनी संगीतबद्ध केलं आहे.

झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात, ” हे गाणं या चित्रपटाचा आणि त्यातील व्यक्तिरेखांचा सूर निश्चित करणारं आहे. हे गाणं जरी कोकणातील गावावार चित्रीत झालं असलं तरी प्रत्येक भागातील प्रेक्षकाला ते आपल्या मातीशी आणि आठवणींशी जोडणारं वाटेल. राहूल देशपांडे आणि आर्या आंबेकर यांच्या जादूई सुराने सजलेलं हे गाणं संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल.”

ऋषिकेश तुरई यांचे लेखन असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विविध कोरगांवकर यांनी केले असून यात जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, वर्षा दांदळे, शार्दुल सराफ, रीलस्टार अथर्व रुके, नवोदित अभिनेत्री प्रियल नाईक आणि उषा नाडकर्णी हे कलाकार पाहायला मिळतील. झी स्टुडिओजच्या उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या ५ जून रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

 

By Sunder

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *