तरुणाईला ठेका धरायला लावणार ‘चंद्राची कोर’! लग्न सोहळ्यात घडणारी एक हळवी प्रेमकथा गाण्यातून रसिकांच्या भेटीला
सध्या मराठी गाण्यांचे अल्बम आणि त्यातील लोकप्रिय कलाकारांची क्रेझ प्रचंड आहे, अशातच संगीत रसिकांसाठी एक नवीन पर्वणी आहे. साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत, संदेश विठ्ठल गाडेकर, सुरेश विठ्ठल गाडेकर यांची निर्मिती असलेले संगीत रसिकांना ठेका धरायला लावणारं ‘चंद्राची कोर’ हे एक नवं कोरं गीत भेटीला आलं आहे. या गाण्याची आणि त्यातील कलाकारांची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
लग्न सोहळ्यात घडणारी प्रेमाची एक हळवी तरीही तितकीच फ्रेश कथा या गाण्यातून मांडण्यात आली असून, आजच्या तरुणाईला आकर्षित करेल असे याचे संगीत संयोजन आहे. गाण्यातील ठेका, व्हिज्युअल्स आणि कलाकारांचा डान्स रसिकांना खिळवून ठेवणारा असून हे गाणे सोशल मीडियावर नक्कीच ट्रेंड करेल.

या गाण्यात मुख्य भूमिकेत लोकप्रिय कलाकार निक शिंदे आणि अभिनेत्री सृष्टी आंबवले यांची जोडी पाहायला मिळणार आहे. या दोघांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांसाठी एक खास आकर्षण ठरणार आहे. सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक विजय भाटे यांनी या गाण्याला सुश्राव्य संगीत दिले आहे. तर आपल्या मधुर आवाजाने लाखो दिलांवर राज्य करणारी गायिका सोनाली सोनावणे आणि प्रसिद्ध गायक रवींद्र खोमणे यांनी हे गाणे गायले आहे. गाण्याचे मनाला भिडणारे आणि अर्थपूर्ण शब्द गीतकार करण सावंत यांनी लिहिले आहेत.
या गाण्याचे दिग्दर्शन तसेच नृत्यदिग्दर्शनाची दुहेरी धुरा मानसी आणि दीपक या जोडीने यशस्वीपणे सांभाळली आहे. गाण्याला एक वेगळा आणि आधुनिक लूक देण्यामध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. गाण्याच्या दिग्दर्शन आणि नृत्यदिग्दर्शनाबद्दल दिग्दर्शक जोडी मानसी आणि दीपक म्हणाले, “या गाण्यावर काम करण्याचा अनुभव अत्यंत अप्रतिम होता. या गाण्यात केवळ उत्तम डान्स स्टेप्स नसून, एक सुंदर भावनिक कथाही विणली गेली आहे. प्रेक्षकांना व्हिज्युअली काहीतरी फ्रेश आणि छान पाहायला मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न केला असून, हे गाणे रसिक प्रेक्षकांना नक्कीच ताल धरायला लावेल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”
By Sunder
