ब्रिटिश सत्तेला हादरावणाऱ्या ऐतिहासिक लढ्याची गाथा; २० नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार ‘पत्री सरकार १९४२’
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सातारा भूमीत ब्रिटिश सत्तेला सळो की पळो करून सोडणाऱ्या प्रतिसरकारचा जाज्वल्य आणि धगधगता इतिहास आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ऐतिहासिक लढ्यावर आधारित ‘पत्री सरकार १९४२’ या आगामी मराठी चित्रपटाचे अधिकृत पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर दिमाखात प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘भागीरथी मोशन पिक्चर्स’ प्रस्तुत हा भव्य ऐतिहासिक चित्रपट येत्या २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रतिसरकारची चळवळ, भूमिगत राहून ब्रिटिशांना दिलेला लढा आणि क्रांतीकारकांचे अतुलनीय शौर्य याचे प्रत्यंतर या पोस्टरमधून येते. पोस्टरवरील कलाकारांचा करारी बाणा आणि स्वातंत्र्यलढ्याचे वातावरण प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असून, या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे.
या चित्रपटाची निर्मिती विशाल गोविंदराव जाधव यांनी केली असून, लेखन, गीत, संगीत आणि दिग्दर्शन अशा विविध जबाबदाऱ्या मनीष अनसुरकर यांनी सांभाळल्या आहेत. चित्रपटात अनिल राबाडे, अनुराधा धामणे, सिद्धार्थ बदी, शुभम गवई, रश्मी साळवी आणि तृप्ती शेडगे हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. याशिवाय, लोकप्रिय अभिनेते अंकित मोहन चित्रपटात अतिथी भूमिकेत दिसणार असून, राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये यांच्या दमदार आवाजात या चित्रपटाचे निवेदन असणार आहे, ही या चित्रपटाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.
चित्रपटाचे छायांकन संदीप वाटवे, परमहंस पाठक, सुमेध मराठे यांनी केले असून संकलन कर्तव्य अनिल मोकल यांचे आहे. पार्श्वसंगीत सौरभ लता शिवकुमार यांनी दिले आहे. स्वातंत्र्यलढ्याचा हा सुवर्ण अध्याय मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असून २० नोव्हेंबरपासून ‘पत्री सरकार १९४२’ संपूर्ण महाराष्ट्रात गर्जना करण्यासाठी सज्ज झाला आहे.
By Sunder M
